बॉटलिंग प्लान्टच्या भागीदारीत २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक; वडील व मुलास अटक…

लोणी काळभोर : पाण्याच्या बॉटलिंग प्लान्टमध्ये भागीदारी देण्याच्या नावाखाली २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी व्यावसायिक आनंद मदनलाल लाहोटी (रा. हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राजेश सत्यनारायण काबरा (वय ५४) व रोहित राजेश काबरा (वय ३०) या पिता-पुत्रास अटक करण्यात आली आहे. लाहोटी हे पेट्रोल पंप व क्रीडा अकॅडमी व्यवसाय चालवतात. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचे नातेवाईक प्रतिक काबरा यांनी “बॉटलिंग व्यवसायात मोठा नफा मिळतो असे सांगून भागीदारीचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून लाहोटी यांनी सुरुवातीला ३ लाख रुपये गुंतवून कदमवाकवस्ती येथे को-पॅकेजिंग व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला नफा दिसल्याने आरोपींनी स्वतःचा प्लान्ट उभारण्याचा प्रस्ताव ठेवून स्वतःचा प्लान्ट सुरू केल्यास जादा नफा मिळेल असे सांगून लाहोटी यांना मोठ्या गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘ए.पी. बेव्हरेजेस’ या नावाने भागीदारी फर्म स्थापन करण्यात आली. त्यामध्ये लाहोटी व प्रतिक काबरा हे समभागीदार होते, तर राजेश व रोहित काबरा यांच्यावर प्लान्ट व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली.

यानंतर प्लान्ट उभारणी, यंत्रसामग्री, परवाने आणि कच्चा माल यासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली गेली. बँक व्यवहार व रोख रक्कम मिळून एकूण गुंतवणूक २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्लान्टमधून दररोज सुमारे ३ हजार बॉक्स उत्पादन होत होते आणि सुमारे ६० लाखांचा व्यवसाय झाला. परंतु फर्मच्या खात्यात फक्त ५.१९ लाख रुपये जमा झाले, उर्वरित रक्कम आरोपींनी स्वतःकडे वळविल्याचे तपासात स्पष्ट झाले.

लाहोटी यांनी हिशोब मागितल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ सुरू झाली. अखेरीस त्यांनी भागीदारी संपवून गुंतवणूक परत मागितली असता “मशिनरी विकून पैसे देतो” असा बहाणा करण्यात आला. मात्र प्लान्टवरील यंत्रसामग्री गायब असल्याचे उघड झाले. चौकशीत मशीनरी ६० लाखांना विकल्याचे सांगण्यात आले, पण त्याचा हिशोबही देण्यात आला नाही. जानेवारी २०२६ मध्ये सोलापूर येथे मशीन विक्रीचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यावर लाहोटी तेथे गेले. वाद झाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच कुरकुंभ येथे ट्रकमधील मशीन हलवतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.
यानंतर लाहोटी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आणि राजेश काबरा व रोहित काबरा यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर प्रतिक राजेश काबरा हा फरार झाले असून पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे.
ही कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार चेतन कुंभार, अण्णा माने, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अशोक गिरी, सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.