शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील; मार्केटयार्डात ‘आंबा महोत्सव-२०२६’चे जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन…

पुणे : ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राची राजधानी मुबंई आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, याकरीता शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एकूणच राज्याचा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे आयोजित ‘आंबा महोत्सव-२०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थित होते.
जयकुमार रावल म्हणाले, सन २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालय आवारात देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, देवगड आणि महामँगो यांच्या माध्यमातून सुरू झालेली उत्पादक ते ग्राहक थेट आंबा विक्रीची संकल्पना आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेली आहे. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक बदल टप्प्याने बदल करुन या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत.

यावर्षीचा महोत्सव सुमारे ४० दिवस सुरू राहणार असून यामध्ये एकूण ६० स्टॉल असून प्रत्येक दोन शेतकरी आंबा विक्री करीत आहे. येत्या काळात पणन मंडळाच्यावतीने सुमारे १५० स्टॉल उभे करण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आपला आंबा थेट ग्राहकांना विकून कायमची शृखंला निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कायमचे संबंध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

महोत्सवात कोकणातील पाच जिल्ह्यांमधील भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी आणि इतर विविध वाणांचे आंबे उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना हापूस आंब्यासाठी जीआय मानांकन मिळाले आहे.भौगोलिक मानांकनामुळे अस्सल हापूस ओळखता येतो व फसवणूक कमी होते.
बदल्या काळानुसार ‘क्यूआर कोड’च्यामाध्यमातून आंबा फळाला नव्याने ओळख करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ‘नो युवर फार्मर’ (एनयुएफ) ही संकल्पनेच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतकऱ्यांची माहिती मिळणार आहे, ज्यामुळे विश्वासार्हता अधिक वाढेल. आगामी काळात समाज माध्यमाचा प्रभावीपणे वापर करुन मोठ्या प्रमाणात या महोत्सवाचे मार्केटिंग करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राज्यात उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्याच्या उद्देशाने मिलेट महोत्सव, संत्रा महोत्सव, आंबा महोत्सव, काजू-बेदाणा महोत्सव अशा विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, पणन संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सीएमआरसी तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग असतो.
आंबा महोत्सवाचा उद्देश शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित साधणारा आहे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री वाढवणे, मध्यस्थ कमी करणे आणि आंबा उत्पादकांना थेट ग्राहक उपलब्ध करून देणे.
मध्यस्थांना वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात उत्तम, दर्जेदार, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले, भौगोलिक मानांकन असलेले आंबे या महोत्सवामुळे मिळतात.
उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय हवामानामुळे आपल्या देशात आंब्याच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे.
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुमारे १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हापूस आंबा त्याच्या चव, सुगंध आणि गुणवत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तसेच लातूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर या भागात केशर आंबा उत्पादन घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा मालाला अधिकाधिक भाव मिळून त्याची आर्थिक स्थर्यता मिळू शकेल.
आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत व्यापार वृद्धीसाठीही पणन मंडळाच्या माध्यमातून दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्याचा उद्देश देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांचा अभ्यास करणे, विविध राज्यांमध्ये शेतमाल विक्री व्यवस्थेत राबविण्यात येणाऱ्या नवकल्पनांची माहिती घेणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या, व्यापारी, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योग यांच्याशी संबंधित माहिती संकलित करणे हा आहे.
मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील फळे, भाजीपाला आणि फुलांच्या मूल्यसाखळी विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्यात निर्माण करण्यात येणार असून ती समुद्र, रेल्वे, विमानतळ आणि महामार्गाशी जोडण्यात येणार आहे, याकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल बांधापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जलदपुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
प्रकाश जगताप म्हणाले, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आंबा महोत्सवाकरिता अधिकाधिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन आंबा खरेदी करावा, असे आवाहन जगताप यांनी केले.