महात्मा फुले यांच्या विचाराला प्रेरीत राज्य सरकाकडून काम; पुणे जिल्हा परिषदेच्या ‘ज्योती सावित्री’ जिल्हा परिषदेच्या शाळेचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांचे योगदान…
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच व जर्मनसारख्या परकीय भाषा आत्मसात केल्या आहेत, हे बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे द्योतक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार…
पुणे जिल्हा परिषदेकडून ‘इंडस्ट्री ४.०’ अंतर्गत १०० शाळांमध्ये १०० अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असे फडणवीस यांनी सांगितले.