रोजगाराचे संकट वाढले, जगप्रसिद्ध मोठ्या कंपनीने थेट 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : जगभरातील आयटी क्षेत्राला हादरवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. अमेरिकन टेक कंपनी Dell Technologies ने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती उघड झाली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर आणि खर्च कपात धोरण हे या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षभरात Dell ने जवळपास 10 टक्के कर्मचारी कपात केली आहे.
31 जानेवारी 2026 पर्यंत कंपनीत 97,000 कर्मचारी कार्यरत असून, मागील वर्षी ही संख्या सुमारे 1,08,000 होती. त्यामुळे ही कपात अचानक झालेली नसून, ती दीर्घकालीन नियोजनाचा भाग असल्याचं स्पष्ट होत आहे.

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनचा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेक पारंपरिक कामे आता मशीन आणि सॉफ्टवेअरद्वारे केली जात आहेत. त्यामुळे कंपन्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI वर अधिक अवलंबून राहत आहेत.

याच पार्श्वभूमीवर Dell ने “cautious hiring” म्हणजेच अत्यंत मर्यादित भरती धोरण अवलंबले आहे. यामुळे नवीन नोकऱ्यांच्या संधी देखील कमी होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंड पुढील काही वर्षांत आणखी वेगाने वाढू शकतो.
Dell चा हा निर्णय केवळ AI मुळे नसून कंपनीच्या खर्च नियंत्रण आणि व्यवसाय पुनर्रचनेचाही भाग आहे. 2025 आर्थिक वर्षातही कंपनीने अशाच प्रकारची कर्मचारी कपात केली होती. त्यामुळे ही रणनीती दीर्घकालीन असल्याचे संकेत मिळत आहेत.
कर्मचारी कपातीमुळे दिल्या जाणाऱ्या सेवरन्स खर्चातही घट झाली आहे. 2026 मध्ये हा खर्च 569 दशलक्ष डॉलर इतका होता, तर मागील वर्षी तो 693 दशलक्ष डॉलर होता. यावरून कंपनी आता अधिक नियंत्रित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कपात करत असल्याचं स्पष्ट होतं.