पुण्यात खळबळ! ‘ती गॅलरीतून पडली’; मृत पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचला पती अन्….पोलिसांनी उघड केला पतीचा काळा कारनामा

पुणे : पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. बिबवेवाडी परिसरात २४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. पत्नी गॅलरीतून पडून मृत्यू झाला, असा बनाव रचणाऱ्या पतीचा खोटेपणा उघडकीस आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सारिका शुभम घोडके (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव असून, आरोपी पती शुभम श्रीकांत घोडके (वय २९) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सविस्तर माहिती अशी की, शुभम घोडके हा पत्नी सारिकाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. २४ मार्च रोजी झालेल्या अशाच एका वादाने उग्र रूप धारण केले. संतापाच्या भरात शुभमने सारिकाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर घाबरलेल्या शुभमने या घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सारिका गॅलरीतून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला, असा बनाव त्याने रचला. गंभीर अवस्थेत सारिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सारिकाच्या अंगावरील जखमांचे स्वरूप आणि गॅलरीतून पडल्याच्या कथनात विसंगती आढळल्याने पोलिसांना संशय आला. घटनास्थळी आढळलेल्या संशयास्पद बाबींमुळे पोलिसांनी शुभमला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. पोलिसी चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.