धक्कादायक प्रकरण! बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सची विक्री; गोरं होण्यासाठी क्रीम वापरली अन् किडनी खराब, तीन व्यापारी अटकेत..


मुंबई : त्वचा गोरी करण्याच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या पाकिस्तानी क्रीम्समुळे थेट किडनीवर परिणाम होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात बंदी असलेल्या या सौंदर्यप्रसाधनांची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

शहरात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या आणि बंदी घातलेल्या पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांमुळे थेट मूत्रपिंडावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी धडक मोहीम राबवून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील दुकानांवर धडक कारवाई केली. ‘हायलाईट कलेक्शन’, ‘ओम ट्रेडर्स’ आणि ‘फलक इम्पोरियम’ या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ५९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या छाप्यात मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस ब्युटी क्रीम अशा विविध पाकिस्तानी क्रीम्स जप्त करण्यात आल्या. याशिवाय पारले गोल्ड, गोरे साबण आणि मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम यांचाही साठा आढळून आला.

पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, अशा बंदी असलेल्या आणि आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या उत्पादनांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

या क्रीम्सचा वापर करणाऱ्या काही तरुण-तरुणींनी आरोग्य बिघडल्याचा दावा केला आहे. गोरं होण्याच्या नादात वापरल्या जाणाऱ्या या उत्पादनांमुळे केवळ त्वचेवर दुष्परिणाम होत नाहीत, तर थेट किडनीवरही गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांच्या मते, अशा बेकायदेशीर आणि अज्ञात घटक असलेल्या क्रीम्समध्ये हानिकारक रसायनांचा वापर होत असल्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेचे विकार, ॲलर्जी, जळजळ यांसोबतच शरीरातील अंतर्गत अवयवांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे नागरिकांनी अशा अनधिकृत सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळावा आणि कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. गोरं होण्याच्या हव्यासापोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याशी खेळ करतायत का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अशा क्रीम्स वापरून कायमस्वरूपी गोरे होता येत नाही, उलट त्वचा आणि किडनी दोन्ही धोक्यात येतात.

सरकारची बंदी आणि पोलिसांची कारवाई असूनही अशा उत्पादनांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनासमोर या बेकायदेशीर विक्रीला आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

वारंवार कारवाई होऊनही अशा सौंदर्यप्रसाधनांची मागणी कायम असल्याने विक्रेते वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची विक्री करत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या साखळीला पूर्णतः आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!