महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल; पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट, दीड तास खलबतं….


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे युवा नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.

सुमारे दीड तास चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती असून, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज ठाकरे आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पोहोचले होते.

तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळले. त्यामुळे या भेटीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्याभोवतीचे संशयाचे धुके लक्षात घेता, या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनीराज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनीही या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे याच मुद्द्यावर कुटुंबाची भूमिका मांडण्यासाठी पार्थ पवार यांनी ही भेट घेतल्याची चर्चा रंगत आहे.

दरम्यान, नुकतेच पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले होते. यावर राज ठाकरे यांनी ‘मराठी पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा’ अशी ठाम भूमिका मांडली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही ही भेट असू शकते, अशीही चर्चा आहे.

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची ही भेट अधिकच महत्त्वाची ठरत आहे. या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी आगामी राजकारणात या भेटीचे परिणाम दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!