खरातचा नवा कारनामा समोर! कंबरेला उघडपणे बंदूक लावून गावोगावी पसरवली दहशत, शेतकऱ्यांच्या जमिनीही बळकवल्या

नाशिक : महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या कारनाम्याबाबत दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून तपासातून आता खरात उघडपणे कमरेला बंदूक लावून गावोगावी दहशत पसरवत असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात हा शनिवार आणि रविवारी न चुकता मिरगाव येथील आपल्या आलिशान फार्म हाऊसवर राहत असे. त्या ठिकाणी त्याने दहशत पसरवली होती.सकाळी तो 10 ते 12 किलोमीटर सायकलिंग करताना तो आपल्या कंबरेला उघडपणे बंदूक लावून फिरत असे. बंदूकीचा धाक दाखवत त्याने संपूर्ण मिरगाव परिसरात आपली दहशत पसरवली होती, ज्यामुळे कोणीही त्याच्याविरुद्ध कुणीही तक्रार देण्यास पुढे येत नसे.
या दहशतीच्या जोरावर खरात याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील बळकवल्या. गावातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध केला, त्यांना धमकावून तसेच त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन कचाट्यात अडकवण्याचे काम केलं. नाशिकच्या या भोंदू बाबाने अनेक घोरी पूजा देखील केल्या. पूजा करताना खरात साप, वाघ निघाल्याचे दाखवत अनेक जणांना आश्चर्याचा धक्का देत त्यांचा विश्वास संपादित करीत असे. अशा प्रकारे भक्तांना घाबरवून पैसे उकळण्याचं काम खरातने केलं.

लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अशोक खरात याच्याविरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी आणि नाशिक पोलिस करत आहे. अशोक खरात प्रकरणात आता एसआयटीकडून तपासाला वेग आला आहे.
या प्रकरणाशी संबंधित अनेक व्यक्तीचीं चौकशी केली जात असून यामध्ये ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कामगारांची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. मंदिराचा पुजारी, वॉचमन आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. यातून खरातचे अनेक कारनामे उघड होत आहेत.