मुहूर्त ठरला! पुणे झेडपीच्या विषय समित्यांना तब्बल चार वर्षाच्या खंडानंतर सभापती मिळणार, 2 एप्रिलला निवडणूक रंगणार..

पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील विविध विषय समित्यांच्या नवीन सभापतींच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तब्बल चार वर्षाच्या खंडानंतर आता विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. येत्या 2 एप्रिलला विविध विषय समितीच्या नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच नवी सभापती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सभापती निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज दाखल करणे — दि. 2 एप्रिल 2026 (सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत)

– विशेष सर्वसाधारण सभा — त्याच दिवशी दुपारी तीन वाजता सुरू होणार.
– उमेदवारी अर्जांची छाननी — विशेष सर्वसाधारण सभा सुरू होताच छाननी करणार.
– उमेदवारी अर्ज माघार घेणे — छाननीत वैध ठरलेल्या उमेदवारांना माघारीसाठी 15 मिनिटांची मुदत देणार.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना येत्या मंगळवारपासून सभापती निवडणुकीसाठीच्या विशेष सर्वसाधारण सभेचा सविस्तर कार्यक्रम पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार 2 एप्रिल रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांनाही पूर्णवेळ सभापती मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेत एकूण दहा विषय समित्या आहेत.यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रत्येकी दोन याप्रमाणे चार विषय समित्या कार्यरत असतात. उर्वरित सहा विषय समित्यांसाठी चार सभापतींची निवड केली जाते. चार सभापतींच्या अख्त्यारित येत असलेल्या सहापैकी समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण या दोन विषय समित्यांसाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन स्वतंत्र सभापती निवडले जातात. उर्वरित चार विषय समित्या या दोन सभापतींना प्रत्येकी दोन विषय समित्यांप्रमाणे वाटप केले जाते.
यानुसार दोनपैकी एका सभापतींकडे बांधकाम व आरोग्य या दोन आणि दुसऱ्या सभापतींकडे कृषी व पशूसंवर्धन या दोन विषय समित्यांचा पदभार दिला जातो. हा पदभार सोपविण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना असतात. जिल्हा परिषदेचे अध्यक्षांकडे स्थायी समिती व जलव्यवस्थापन आणि स्वच्छता या दोन विषय समित्या आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे अर्थ व नियोजन आणि शिक्षण या दोन अशा एकूण चार विषय समित्या असतात.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत विषय समितीच्या नवीन सभापतीची निवडणूक करणे जिल्हाधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. त्यानुसार येत्या 2 एप्रिलला आता जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या नवीन सभापदाची निवड करावी लागणार आहे. या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.