पुणेकरांनो सावधान! उद्या ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरा…

पुणे : पुण्यातील काही भागांमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा तसेच आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे महानगरपालिका यांच्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम 24 मार्च 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवावा लागणार आहे. दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू राहणार असल्याने मंगळवारी संबंधित परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा मिळणार नाही.

या कामामुळे सेनापती बापट रोड परिसरातील दोन्ही बाजूंच्या वसाहतींना पाणी मिळणार नाही. तसेच गोखले नगर परिसरातील आशानगर, गोखले नगर आणि बहीरटवाडी या भागांवरही या कपातीचा परिणाम होणार आहे. शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनी परिसरातही पाणीपुरवठा बंद राहील. मॉडर्न कॉलेजच्या आसपासचा परिसर, चिखलवाडी आणि मॉडेल कॉलनीतील रहिवाशांना याचा थेट परिणाम जाणवू शकतो.
याशिवाय औंध आणि बाणेर परिसरातील काही भागांमध्येही पाणीपुरवठा खंडित होणार आहे. भोसले नगर, कॅशरकर वाडी तसेच औंध-बाणेर पट्ट्यातील काही वसाहतींमध्ये दिवसभर पाणी मिळणार नाही. बोपोडी परिसरातील नागरिकांनाही या कपातीचा सामना करावा लागणार आहे.
पालिकेच्या माहितीनुसार जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बुधवार, 25 मार्च 2026 पासून सकाळी शहरातील प्रभावित भागांमध्ये पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने ही आगाऊ सूचना दिली आहे. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना मंगळवारसाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.