उपसभापती नीलम गोऱ्हेकडून सातारा एसपींचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

पुणे : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्याची विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी सातारा पोलीस अधीक्षकांचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत.

विधान परिषदेच्या सभागृहात सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान घडलेल्या गोंधळावर जोरदार चर्चा झाली.यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कठोर भूमिका घेत साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकाचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश दिले. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक देवकर यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घातला जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत त्याने तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मंत्री जयकुमार गोरे यांनी या निलंबनाला कडकडून विरोध केला आहे. ते म्हणाले,सभापती महोदया तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे होतं, तत्पूर्वी तुम्ही निर्देश दिले. ज्याचं अपहरण झालं तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या कुटुंबियांनी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केला होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे करण्याचे काम कुणी केले. चार हजार लोकं जिल्हा परिषदेत घुसले ते कुणी आणले? याचे देखील उत्तर द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.