पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! मराठवाडा-मध्य महाराष्ट्र धोक्यात, शेतकऱ्यांची वाढली चिंता…

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मार्च महिना संपत आला तरीही पावसाची हजेरी कायम असून अवकाळी पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे.

आज मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतर भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढणार आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
याशिवाय सांगली, सातारा, धाराशिव, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत असून त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असला, तरी राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता कायम आहे.

त्यामुळे आज राज्यात हवामानात सतत चढ-उतार अनुभवायला मिळणार आहेत. राज्यासह देशातील अनेक भागांतही पावसाची हजेरी सुरू आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस पडत असून, त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराड येथे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे चार एकरांवरील ज्वारी पिक जमीनदोस्त झाले.
या घटनेत शेतकऱ्याच्या संपूर्ण ज्वारी पिकाचे नुकसान झाले असून अंदाजे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 100 क्विंटल ज्वारीचे उत्पादन अपेक्षित होते, मात्र वादळी वाऱ्यामुळे सर्व पीक आडवे पडले. या नुकसानीमुळे संबंधित शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.