दिल्लीतील बैठकीनंतर ठाकरे गटात नाराजी नाट्य ; उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’वर खासदारांची तातडीची बैठक

पुणे: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर ठाकरे गटात मोठी ठिणगी पडली आहे. पक्षांतर्गत नाराजी समोर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत खासदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही,” अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वरिष्ठ नेत्यांसमोर वाचला होता.त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर येत असल्याचं दिसून येत आहे.
ठाकरे गटाच्या खासदारांनी याच बैठकीत थेट नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत?” असा सवालही खासदारांनी विचारला होता. खासदारांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरत ही बैठक बोलावली आहे. त्यानंतर ठाकरे गटात सगळं काही आलबेल नाही, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. आता उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.