उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा वर्धापनदिन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते; राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दौरा निश्चित…

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाचा ८१ वा वर्धापन दिन रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी भारताचे उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे अशी माहिती निसर्गोपचार आश्रमचे कार्यकारी विश्वस्त डॉ.एन.जी.हेगडे यांनी दिली.

दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, आमदार ज्ञानेश्वर कटके व आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे मुख्य विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .
उपराष्ट्रपतींच्या या दौऱ्यासाठी पोलीस यंत्रणा व निसर्गोपचार आश्रम प्रशासन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले असून सुरक्षा तपासणी सुरळीत पार पडण्यासाठी निमंत्रित नागरिकांनी सकाळी १०:३० वाजेपर्यंत आश्रमात उपस्थित रहावे आणि ११ वाजेपर्यंत आसनस्थ व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.मान्यवरांच्या आगमनापूर्वी परिसरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्यानुसार नियोजन करावे असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
