सोन्याच्या भावात चढ-उतार; गुढीपाडव्यापर्यंत काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे भाकीत…

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मात्र यंदा सोन्याच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वाढती मागणी यामुळे सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे सध्या सोने खरेदी करावी की काही काळ थांबावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, गुढीपाडव्याच्या आसपास सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. सौरभ गाडगीळ (पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किमतीत सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.लग्नसराईचा हंगाम आणि आगामी य तृतीया यामुळेही सोन्याची मागणी वाढत असून, त्यामुळे दरात आणखी चढ-उतार दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोनं खरेदी करताना उद्देश स्पष्ट असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वापरासाठी सोने खरेदी करायचे असल्यास दागिने हा उत्तम पर्याय ठरतो. सध्या हलक्या वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
मात्र, केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदी करायचे असल्यास सोन्याची नाणी किंवा बिस्किटे घेणे अधिक फायदेशीर मानले जाते. दागिन्यांवर आकारले जाणारे मेकिंग चार्जेस विक्रीच्या वेळी परत मिळत नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी शुद्धतेची खात्री असलेले नाणे किंवा बिस्किटे हा अधिक योग्य पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.