गुढीपाडवा 2026: शुभ मुहूर्तातच उभारा गुढी; योग्य वेळ कोणता? वाचा सविस्तर…

पुणे : हिंदू पंचांगानुसार यंदाच्या फाल्गुन अमावस्येबाबत अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा अमावस्येची तिथी दोन दिवसांपर्यंत प्रभावी राहणार असल्यामुळे पितृ तर्पण, श्राद्ध तसेच इतर धार्मिक विधी नेमके कोणत्या दिवशी करावेत, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री कधी सुरू होणार, तसेच गुढी उभारण्याचा अचूक शुभ मुहूर्त कोणता, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
2026 मध्ये फाल्गुन महिन्यातील अमावस्या तिथी 18 मार्च रोजी सकाळी 8.25 वाजता सुरू होऊन 19 मार्च रोजी सकाळी 6.52 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवसांमध्ये अमावस्येचा प्रभाव राहणार आहे.

मात्र, धार्मिक परंपरेनुसार पितृ तर्पण, श्राद्ध आणि दानधर्मासाठी दुपारच्या काळात अमावस्या तिथी असणे महत्त्वाचे मानले जाते. याच कारणामुळे 18 मार्च हा दिवस पितृ तर्पणासाठी अधिक योग्य आणि श्रेयस्कर मानला जात आहे.
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार अमावस्येचा दिवस पितरांना समर्पित मानला जातो. या दिवशी अनेक जण आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण, पिंडदान तसेच दानधर्म करतात.
धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येच्या दिवशी पितर पितृलोकातून पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबीयांकडून केलेले तर्पण स्वीकारतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेल्या विधींमुळे पितरांची कृपा लाभते आणि कुटुंबात सुख, शांती व समृद्धी नांदते, असे मानले जाते.
अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर दुपारच्या वेळी पितरांसाठी तर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. यावेळी गुळ-तूप, खीर किंवा पुरी यांसारख्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
तसेच भगवान शिव यांची पूजा करून शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करणेही अनेक जण करतात. पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालणे, गरजू व्यक्तींना अन्नदान करणे आणि सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावून प्रार्थना करणेही शुभ मानले जाते. याशिवाय हनुमानजींची पूजा करून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करण्याचीही प्रथा आहे.
दरम्यान, 19 मार्च रोजी सकाळी अमावस्या संपल्यानंतर नदी किंवा पवित्र जलाशयात स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आणि मराठी नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्याच्याया सणाद्वारे केले जाते.