बारामतीत भीषण अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको….


बारामती : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची घटना उघडकीस आली आहे.भीषण अपघातात एका ग्रामसेवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार गावाजवळील राज्य मार्गावर सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला.

मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी काही काळ रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले.

मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी रात्री काम आटोपल्यानंतर ते आपल्या घरी परतत असताना जळगाव कडेपठार परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन…

अपघाताची बातमी कळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या राज्य मार्गावर अद्यापही गतिरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

याच पार्श्वभूमीवर जळगाव कडेपठार येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे बारामतीकडे जाणारी व येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच येथे गतिरोधक उभारले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!