तीव्र दुष्काळ असूनही यंदा दिवाळीत मिळणार नाही आनंदाचा शिधा, अनेकांची दिवाळी होणार कडू…


मुंबई : यावर्षी राज्यात पावसाने ओढ दिल्याने मोठा दुष्काळ पडला असून सरकारने देखील दुष्काळ जाहीर केला आहे. असे असताना राज्यात तीव्र दुष्काळ असूनही यंदाच्या दिवाळीत राज्यातील गोरगरीब जनतेला यंदा ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारने शिधावाटप न करण्याचे ठरविले आहे.

ही योजना कागदावरच उरली असून दुष्काळातही आनंदाचा शिधा गरिबांना मिळणार नाही. यामुळे विरोधकांनी देखील सरकारवर टीका सुरू केली आहे. सरकारने दिवाळीत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय ४ ऑक्टोबर २०२२ रोजी घेतला होता. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला.

केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनाही या संचाचे वाटप केले गेले. तीन वर्षांपूर्वी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी यानिमित्त आनंदाचा शिधा देण्यात आला होता. मात्र आता गरज असताना देखील सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल आणि रवा, चणाडाळ, मैदा व पोहे प्रत्येकी ५०० ग्रॅम अशा वस्तू देण्यात आल्या होत्या.

यामागे आर्थिक कारण असले तरी दुष्काळ परिस्थितीमुळे याबाबत सरकारने विचार करणे आवश्यक आहे. आनंदाचा शिधा देण्यासाठी प्रत्येक वेळी ६०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यक आहे. ज्यावेळी शिधा द्यायचा असतो, त्यावेळी सूचना आल्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मंत्रिमंडळापुढे खर्चाचा प्रस्ताव सादर केला जातो आणि तो मंजूर झाल्यावर निविदा काढून शिधावाटप केले जाते.

यंदा अजून कोणत्याही सूचना न आल्याने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवला नसल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यात अनेक भागात भीषण दुष्काळ आहे. राज्य सरकारला दिवाळीसाठी आनंदाचा शिधा द्यायचा नसेल, तर दुष्काळाचा तरी द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!