महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी येणार? राज ठाकरेंचं मोठं विधान; मराठी माणसांना साद…


मुंबई : राज्यातील शहरांमधील वाहतूक कोंडी, बिघडलेले शहर नियोजन आणि नागरी सुविधांच्या अभावावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अनेक वर्षांपासून शहरांमधील समस्या गंभीर होत असतानाही सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नसून केवळ इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे सांगत, महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे विधान त्यांनी केले.

नवी मुंबई येथे आयोजित भव्य वाहतूकदार मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी वाहतूकदारांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली. तसेच राज्यातील शहर नियोजन, वाहतूक कोंडी, पार्किंग आणि रस्त्यांसह विविध नागरी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.

शहर नियोजनाचा बोजवारा; राज ठाकरेंची टीका

परदेशात शहर नियोजनाला गांभीर्याने महत्त्व दिले जाते; मात्र महाराष्ट्रात शहर नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ज्या ठिकाणी ५० लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे, तिथे ५०० लोक राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरांमधील नियोजन कोलमडले असून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, असे त्यांनी नमूद केले.

दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शहरांमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने वाहने कुठेही उभी केली जातात. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मैदाने नाहीत, बागा नाहीत; नागरिकांच्या समस्या कायम

शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदाने, नागरिकांना फिरण्यासाठी बागा आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी व्यवस्थित पदपथ उपलब्ध नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांपेक्षा बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्प देणे आणि आर्थिक गणिते साधणे यालाच राजकारण्यांकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“शहरांचे प्रश्न सोडवण्यासाठी इच्छाशक्ती हवी”

राज्य सरकारकडे शहरांमधील प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा प्रस्ताव देऊनही त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. वाहतूक कोंडी आणि शहर नियोजनासारख्या समस्या सोडवणे अशक्य नाही. त्यासाठी केवळ ठोस निर्णय घेण्याची इच्छाशक्ती आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील नागरी प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका मांडत राज ठाकरे यांनी आगामी काळात महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील नागरी प्रश्न आणि राजकीय भूमिकेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!