संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी 14 महिन्यानंतर जेल बाहेर येणार ; कोर्टाने का दिली परवानगी?

बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्यासह इतर आरोपी देखील तुरुंगात आहेत. आता या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा 14 महिन्यांनी तुरुंगाबाहेर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एक आरोपी तुरुंगाबाहेर येणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे यांचे 2मार्च रोजी तांबवा येथे निधन झाले. हिंदू परंपरेनुसार बाराव्याच्या धार्मिक विधीला उपस्थित राहता यावे, यासाठी चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष अर्ज दाखल केला होता. या अर्जाला सरकारी वकिलांनी कडाडून विरोध केला. मात्र न्यायालयाने मानवी दृष्टिकोनातून आरोपीला सकाळी,9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात विधीस उपस्थित राहण्याची मुभा दिली. या प्रवासाचा आणि पोलीस बंदोबस्ताचा सर्व खर्च स्वतः आरोपीलाच करावा लागणार आहे.
आरोपी जयराम चाटे तब्बल 14 महिन्यांच्या कारावासानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या धाकट्या भावाच्या उत्तरकार्यासाठी न्यायालयाने चाटेला काही तासांसाठी पोलीस बंदोबस्तात कारागृहाबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र या आरोपीला काही तासांसाठीच हा दिलासा असणार आहे.

जयराम साठीयाला कोर्टाबाहेर येण्याचा आदेश दिल्याने सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती. धार्मिक विधीच्या निमित्ताने आरोपी गावात येणार असल्याने तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.