महिला दिनानिमित्त ‘पीएमपीएल ‘ देणार विशेष पर्यटन सेवा ; महिलांना’या’ 31 मार्गांवर मोफत प्रवास

पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाने महिलांसाठी विशेष पर्यटन बस सेवा दिली आहे.आज, 8 मार्च रोजी शहरातील विविध 11 मार्गांवर धावणाऱ्या ‘महिला विशेष’ बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी ‘पीएमपी’ने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील धार्मिक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांचा आनंद नागरिकांना घेतावा यावा यासाठी ही विशेष पर्यटन बस सेवा सोडण्यात आली आहे पीएमपीएल प्रशासन सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात 76 महिला विशेष बस फेऱ्या चालवते. या सर्व फेऱ्यांमध्ये आज महिलांना विनातिकीट प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
महिला दिन आणि रविवारची सुट्टी याचा योग साधत महिलांना पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी मिळावी यासाठी एकूण 33 बसेसच्या माध्यमातून ही सेवा दिली जात असून, महिला प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोफत प्रवासाच्या सुविधेत शहरातील महत्त्वाचे मार्ग कोणते?
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, कात्रज ते शिवाजीनगर, कात्रज ते कोथरुड डेपो.
हडपसर ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते मनपा भवन, हडपसर ते निगडी.
पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, निगडी ते हिंजवडी (मेगा पॉलिस).
भोसरी ते चिंचवड गाव, शेवाळेवाडी ते कात्रज आणि मनपा भवन ते वाघोली.
या व्यतिरिक्त चिखली ते डांगे चौक आणि भोसरी ते हिंजवडी फेज ३ यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील महिला विशेष बसमध्येही ही सवलत लागू असेल. महिला दिनानिमित्त देण्यात आलेल्या या ‘गिफ्ट’मुळे नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.