जॉब करायला पुण्यात आल्या अन् बुधवार पेठेत अडकल्या, बंद खोलीत नको ते घडलं, चौघींची भयंकर कहाणी समोर…

पुणे : पुण्यात आलेल्या चार महिलांचं आयुष्य एका भयानक स्वप्नात बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्युटी पार्लर आणि शिवणकामाच्या नोकरीचं आमिष दाखवून त्यांना पुण्यात आणलं गेलं. मात्र प्रत्यक्षात त्यांना बुधवार पेठेतील एका खोलीत डांबून वेश्याव्यवसायासाठी बळजबरी केली जात होती.

मिळालेल्या माहिती नुसार, या महिलांना बांगलादेशातून भारतात आणताना चांगल्या पगाराची आणि राहण्याची स्वप्नं दाखवण्यात आली होती. परंतु पुण्यात आल्यानंतर त्यांचे मोबाईल आणि कागदपत्रे काढून घेत त्यांना एका खोलीत डांबून ठेवलं. जेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचं समजलं आणि त्यांनी विरोध केला, तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
हळूहळू या महिला पूर्णपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या. झोन-१ चे डीसीपी ऋषिकेश रावळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ५ मार्च रोजी सायंकाळी पोलिसांनी बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर छापा टाकला.

वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भास्मे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत चार पीडित बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून, एका पुरुषाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी बांगलादेशातील एजंटसह बाबू भैय्या उर्फ पापा शेख, भोपसिंग राजपूत आणि जागेची मालकीण मीनाक्षी रमेश मेत्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भीषण प्रकारामुळे पुण्याच्या बुधवार पेठेत पुन्हा एकदा मानवी तस्करीचे सावट गडद झाले आहे. पोलीस आता या रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्यासाठी अधिक तपास करत असून, यामागे आणखी मोठे नेटवर्क असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.