‘…तर तुला ठार करेन’, मंत्री विखे पाटलांच्या निकटवर्तीयाला धमकी, नगरमध्ये खळबळ..

पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका निकटवर्तीयाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,राहाता नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक दशरथ तुपे यांना तुषार सदाफळ या व्यक्तीने फोनवरून तसेच चौकात जमाव जमवून पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तुषार सदाफळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहाता शहराचे ग्रामदैवत श्री विरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला दिले नाही, याचा राग मनात धरून सदाफळ याने हे कृत्य केले असल्याचा तक्रारदाराने सांगितल आहे..तुषार सदाफळ हा परवानाधारक बंदुकीच्या जोरावर नेहमीच शहरातील व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करतो. यात्रेच्या टेंडर प्रक्रियेत माझा काहीही संबंध नसताना मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मला आणि माझ्या कुटुंबाला तुषार सदाफळ याच्यापासून धोका असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तुपे यांनी केली आहे.

या घटनेनंतर तुषार सदाफळ हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विखे पाटलांच्या निकटवर्तीय नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.