घरात बायको असतानाही त्याचे दुसरीसोबतच संबंध, पत्नीनं जाब विचारताच पतीनं दगड उचलला अन्…घटनेने पुणे हादरले…

पुणे : आपल्या प्रेमसंबंधाला अडसर ठरत असल्याच्या रागातून पतीने चक्क आपल्या २२ वर्षीय पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने, या हल्ल्यातून पत्नी बचावली असून मावळच्या सुदवडी परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, संशयित आरोपी राममणी कुशवाहा (रा. म्हाळुंगे, खेड) याचे त्याच्याच नात्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते. बुधवारी (४ मार्च) दुपारी आरोपीने पत्नीला सुदवडी (ता. मावळ) येथील भंडारा डोंगराच्या पायथ्याला नेले.
तिथे पुन्हा एकदा याच कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापलेल्या राममणीने तिथे पडलेला एक मोठा दगड उचलून थेट पत्नीच्या डोक्यावर आणि शरीरावर मारून तिला गंभीर जखमी केले.

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीने याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आणि आरोपी पती राममणी कुशवाहा याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.