इराण -इस्राईलच्या संघर्षात कांदिवलीचा ‘दीक्षित’ ठरला बळी, 2 भारतीयही बेपत्ता, मृत असल्याची शक्यता?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्त्राईलच्या युद्धाची झळ आता मुंबईला बसली आहे. ओमानच्या किनारपट्टीवर मस्कतजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात कांदिवलीच्या खलाशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,मूळचा दीवचा असलेला २५ वर्षीय दीक्षित सोलंकी कामासाठी मुंबईत स्थायिक झाला होता. इराण- इस्रायलच्या युद्धाच्या वनव्यात ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून 52 नॉटिकल मैलांवर असलेल्या ऑईल टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने धडक दिली. या भीषण स्फोटात टँकरच्या इंजिन रूमला आग लागली आणि त्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान इराण आणि इस्रायलच्या या युद्धजन्य परिस्थितीत आतापर्यंत तीन भारतीयांना आपला जीव गमवावा लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या दोन भारतीय बेपत्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.यामध्ये बिहारचा आशिष कुमार आणि राजस्थानचा दलीप सिंग हे दोन भारतीय गेल्या ४८ तासांपासून बेपत्ता आहेत.

बेपत्ता भारतीयांची शोधमोहीम सुरू असली तरी त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे..