काळजी घ्या! ‘मार्च हिट’ने महाराष्ट्र होरपळणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी, पुणेमध्ये आज…

पुणे : पुढील दोन दिवसांत पुणे आणि परिसरामध्ये तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कमाल तापमानात वाढ अधिक होणार असल्याने शहरात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. पुण्यात मंगळवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती. दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके जाणवले. दिवसभरात सरासरीपेक्षा जास्त ३५.५ कमाल आणि १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.
राज्यातील उच्चांकी तापमान ३८.६ अकोला येथे आणि नीचांकी तापमान १५.२ मालेगाव येथे नोंदविण्यात आले. वातावरणातील बदलांमुळे सध्या शहरातील उकाडा वाढला आहे. किमान तापमानात मात्र अजून चढ-उतार सुरूच आहेत.

रात्रीचा गारवा ओसरला आहे, पण पहाटे अजून आल्हाददायक वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता असल्याने पुन्हा रात्रीच्या वातावरण बदलण्याचा अंदाज आहे.

राज्यात वेगवेगळ्या भागात नोंदवले गेलेले कमाल तापमान …
पुणे – ३५.५
नाशिक – ३५.२
लोहगाव – ३६.९
जळगाव – ३७.२
कोल्हापूर – ३४.९
सोलापूर – ३८
अकोला – ३८.६
वर्धा – ३८.५
नागपूर – ३६.२
दरम्यान, हवामान विभागाने मार्च आणि एप्रिल महिन्यात यंदा उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्याची प्रचीती पुणेकरांना गेल्या चार दिवसांपासून येते आहे. कपड्यांच्या दुकानातील स्वेटर, जॅकेटची जागा आता सनकोट, गॉगल, टोप्या असा उन्हाळ्यातील साहित्याने घेतली आहे. पुणेकरांनीही उन्हाळी साहित्य खरेदीस सुरुवात केली आहे.