मध्यरात्री एसटीला काळ्या स्कॉर्पिओचा घेराव; चालक-वाहकाला बेदम मारहाण, रोकड लुटली अन् बसची चावी घेऊन आरोपी फरार!


शिरुर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बसला काळ्या रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या स्कॉर्पिओने अडवून चालक-वाहकाला मारहाण, रोकड लूट आणि बसची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. न्हावरे फाटा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे महामार्गावरील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही घटना ४ सप्टेंबर रोजी पहाटे १:४५ ते २ वाजण्याच्या सुमारास, कानिफनाथ मंदिराजवळ घडली. एसटी चालक संदीप गणपत थोरवे (वय ३६) यांच्या फिर्यादीवरून शिरुर पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तींविरोधात जबरी चोरीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे हे एमएच १४ एनपी ०८३८ क्रमांकाची एसटी बस पुण्याहून शिरुर आगाराकडे घेऊन जात होते. न्हावरे फाट्याजवळ अचानक नंबर नसलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ बससमोर आडवी लावण्यात आली. बस थांबताच २५ ते ३० वर्षे वयोगटातील चार जण खाली उतरले आणि ‘आमच्या गाडीला धक्का का दिला?’ असा जाब विचारत पैशांची मागणी करू लागले.

चालकाने बसचा धक्का लागला नसल्याचे सांगून शिरुर आगारात बस तपासण्याचे सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. चालकाला मारहाण होत असल्याचे पाहून वाहक सतीश आण्णासाहेब बाचकर मदतीला धावले. आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. यावेळी एका आरोपीने स्कॉर्पिओमधील कोयते काढण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, गोंधळाचा फायदा घेत एका आरोपीने वाहकाच्या शर्टच्या वरच्या खिशातील ८ हजार ९६० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने रस्त्यावरचा दगड उचलून एसटीच्या पुढील काचेवर फेकला. काचेचे नुकसान झाल्यानंतर आरोपींनी बसची चावीही ताब्यात घेतली आणि स्कॉर्पिओमधून घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील कॅमेरे आणि संशयित स्कॉर्पिओच्या हालचालींच्या आधारे चारही आरोपींचा शोध घेतला जात आहे. नंबर नसलेल्या वाहनातून आलेल्या टोळक्याने मध्यरात्री एसटी कर्मचाऱ्यांना लक्ष्य केल्याने महामार्गावरील पोलिस गस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!