स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच शर्टाचं बटन ते लैंगिक चाचणी, वर्षभरात काय घडलं? पिडीता अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेतच…

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी दत्ता गाडे याच्याविरोधात अद्यापही आरोप निश्चिती झाली नाही. त्याने आता जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच आरोप निश्चिती होऊन खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

काय आहे प्रकरण?
वर्षभरापूर्वी याच दिवशी स्वारगेट आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे पावणेसहा ते पावणेसातच्या दरम्यान घडली होती. गुन्हा केल्यानंतर आरोपी गाडे हा पसार झाला होता आणि आपल्या गावातील शेतात लपून बसला होता.अखेर पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढून त्याला शिरूर परिसरातून बेड्या ठोकल्या.

आरोपी दत्ता गाडे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर फक्त 52 दिवसाच्या आत 892 पानांचा आरोप पत्र न्यायालयात दाखल केलं होतं. त्यात 82 साक्षीदारांकडे तपास करून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.एकूण 12 पंचनामे करण्यात आले असून, गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून गाडे गुन्ह्याच्या वेळी घटनास्थळी हजर असल्याचे थेट व परिस्थितीजन्य पुरावे आरोपपत्रात आहेत.
आरोपी दत्ता गाडे यांनी जामीन मिळवण्यासाठी याआधी केलेले दोन्ही अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यानंतर त्याने जामीनासाठी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज केला आहे तसेच या गुन्ह्यातून मला निर्दोष मुक्त करा असे देखील म्हटले आहे. पुणे पोलीस,सरकारी वकील आणि पीडितेचे वकील यांनी याला विरोध केला आहे. या घटनेला एक वर्ष उलटले तरीही अद्याप पिडीता न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे.
दरम्यान शिवशाही बसमध्ये अत्याचार झालेल्या घटनास्थळावर आरोपीची केस आणि शर्टाचे बटन सापडले असून रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासणीत ते गाडेचे असल्याचे निष्पन्न झाल आहे. तसेच घटनेच्या दिवशी तो पिडीतेशी बोलत असल्याचं पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी बोलताना पाहिले असून त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत. तसेच आरोपी गाडी लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या तीन तज्ञ डॉक्टरांनी देखील दिला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज मोबाईल नंबर वरून सायबर तज्ञमार्फत त्याची गुगल सर्च हिस्ट्री यावरून वारंवार तो अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचा दिसून आलं. त्याच्या विरोधात अनेक पुरावे सापडले आहेत.
दरम्यान आरोपी दत्ता गाडेचा डीएनए जुळला असल्याचे देखील माहिती समोर आली आहे. त्याच्या शर्टाच बटन पोलिसांना बस मध्ये सापडला आहे. या प्रकरणात एसटी महामंडळ, कर्मचारी,कॅब चालक, रिक्षाचालक,त्याचबरोबर वैद्यकीय अहवाल ओळख परेड हे महत्त्वाचे पुरावे आरोप पत्रात लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.