मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; महिला सरपंच लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात..

पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता झिरवळाच्या दिंडोरी मतदार संघातील रासेगाव येथे महिला सरपंचाला पंधरा हजार रुपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदार संघातील रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे यांनी उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव नामजूर करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत पंचवीस हजार मान्य करण्यात आले.यापैकी पंधरा हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मंत्री झिरवळ यांच्या मतदारसंघातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने विरोधकांनी आता झिरवाळ यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. एसीबीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान या कारवाईत नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकातील अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.मतदारसंघातील या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.