शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तब्येत कशी? डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला…

पुणे : गेल्या चार दिवसांपासून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार उपचार घेत होते. आज डॉक्टरांनी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे, अशी माहिती शरद पवार यांचे अतिशय जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी दिली.

शरद पवार पुढील काही दिवस मुंबईतील आपल्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत, असेही विठ्ठल मणियार यांनी सांगितले. शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चार दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.
सलग चार दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतल्यानंतर आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, थकवा आणि काही चाचण्यांच्या कारणास्तव पवारांना रुग्णालयात दाखल केले होते.

या चार दिवसांत त्यांच्या काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आता या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट समाधानकारक आले आहेत. तसेच त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याने डॉक्टरांच्या पथकाने त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
शरद पवार यांचे अतिशय जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी शरद पवार यांना पुढील काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सततचे दौरे आणि सभांमुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण येत आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळेच आता ते पुण्यातून थेट मुंबईच्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना होणार आहेत.