कोल्हापूर – मुंबई विमानसेवेचा मुहूर्त ठरला, वेळापत्रक ही आले समोर…

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोल्हापूरसाठी बहुप्रतिक्षित थेट विमानसेवा सुरू होत असून इंडिगो कंपनीने याचे अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.या सुरु झालेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूरमधील पर्यटन स्थळांना भेटी देणे मुंबई किंवा या आसपासच्या नागरिकांना फायद्याचे ठरणार आहे.

इंडिगो या विमान कंपनीकडून 29 मार्चपासून या मार्गावर दररोज दोन थेट उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत. या फ्लाइटसाठी तिकिट बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.इंडिगोने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार कोल्हापूरहून नवी मुंबईकडे सकाळी 9.35 ते 10.35 आणि रात्री 8.50 ते 9.50 अशी दोन उड्डाणे असतील तर नवी मुंबईहून कोल्हापूरकडे सकाळी 8.00 ते 9.15 आणि सायंकाळी 7.20 ते 8.30 या वेळेत विमानसेवा उपलब्ध असेल.
या नव्या सेवेचा सर्वाधिक फायदा हा व्यावसायिक, उद्योजक तसेच एका दिवसात मुंबईला जाऊन परत येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. आतापर्यंत रेल्वे किंवा रस्त्याने प्रवास करताना जास्त वेळ लागत होता. आता विमानसेवेच्या मदतीने काही तासांत प्रवास पूर्ण होणार आहे.

या थेट विमानसेवेने दोन्ही शहरांमधील पर्यटन आणि उद्योग क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाल्याने या मार्गावरील प्रवास अधिक सोपा होणार आहे.