अजितदादा म्हणायचे शर्टाचे वरचे बटन लाव, पण जेव्हा दादांना भेटायला जाईल तेव्हा…!! रोहित पवार ढसाढसा रडले

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एग्झिटनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण सभागृह एका अत्यंत जड आणि शोकाकुल वातावरणात बुडाले होते.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली. त्यावेळी सभागृहात उपस्थित सर्वच नेत्यांचा कंठ दाटून आला. त्याचवेळी सभागृहात शोकप्रस्तावावेळी दिवंगत नेते अजित पवार यांच्याबाबत बोलताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार भावूक झाल्याचं दिसून आलं.
आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा असं अजित पवार म्हणायचे. पण चाळीस-पन्नास वर्षानंतर कधी दादांची वरती भेट होईल, त्यावेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसंच खुलं असेल, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असं रोहित पवार म्हणाले.

एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर. दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. अजितदादा नेहमी मला म्हणायचे की, तुझं शारिरीक वजन वाढलंय. शारिरीक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो. माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन…
एक गोष्ट खरीय, ते मला म्हणायचे की, वरचं बटण लावत जा… पण एक मात्र मी सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर मी ज्यावेळी अजितदादांना भेटायला जाईन, तोपर्यंत मी माझं बटण असंच उघडं ठेवणार. कारण हे वरचं बटण तुमची मला रोज आठवण देत राहील.., अंस रोहित पवार म्हणाले.
एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर ज्यावेळी कधी तुमची भेट होईल, तेव्हा हा माझा लढा सुरू आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर मी ताठ मानेनं उभा राहीन. त्यावेळी नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का! या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवलाय.
दादांच्या अपघातासाठी जो कुणी जबाबदार असेल, जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही मोठा असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. काकी, तुमच्या राजकीय प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्याची, तुमच्या पुतण्याची ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी मी तयार असेन…, असं आश्वासनही रोहित पवारांनी दिलं.