लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारकडून भेट, जानेवारीचे ₹१५०० जमा झाले, तुम्हाला आले का?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. ई-केवायसी पडताळणी सुरू झाल्यापासून अनेक महिलांना हप्त मिळण्यात अडचण येत होती.
त्यात ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या. अखेर विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने लाडक्या बहिणींना भेट दिली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जात आहेत. सोमवारी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले.

सतत तांत्रिक अडचणी येत असल्याने ई-केवायसीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षापर्यंत महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत २.४ कोटींहून अधिक लाभार्थी महिला होत्या. परंतु ई-केवायसीद्वारे पडताळणी सुरू झाल्यानंतर डिसेंबर २०२५ महिन्यात फक्त १.६ कोटी लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळाला.
जानेवारी महिन्याच्या मध्यात हा हप्ता मिळाला होता. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येतेय.जानेवारीत राज्यातील २९ महानगपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या.
त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. जानेवारीचा हप्ता प्रलंबित होता. फेब्रुवारी महिना संपत आला तरी अद्याप हा हफ्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात होता.