पोटच्या सावत्र भावानंच बहिणीला पळवलं अन्…पुढे घडलं अत्यंत भयंकर, घटनेने बीड हादरलं

बीड : रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेने बीड जिल्ह्यातील केज परिसर हादरला आहे. सावत्र भावानेच आपल्या दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन बहिणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेतून घरी परतल्यानंतर मुलगी न आल्याने आईला संशय आला आणि शोधमोहीम सुरू झाली. अखेर आईने केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या १२ तासांत मुलीची सुटका करून आरोपी सावत्र भावाला अटक केली. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.

नेमकं घडलं काय?
पीडित मुलीच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने पुनर्विवाह केला होता. १६ फेब्रुवारी रोजी मुलगी आणि तिचा लहान भाऊ नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. मात्र शाळा सुटल्यानंतर भाऊ घरी परतला, पण मुलगी घरी आली नाही.
कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती बसस्थानकाच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली. आईने तक्रारीत आपल्या दुसऱ्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलावर संशय व्यक्त केला. म्हणजेच सावत्र भावानेच मुलीला फूस लावून नेल्याची शक्यता वर्तवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केज पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. तांत्रिक तपासाद्वारे आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले. लोकेशन परळी परिसरात आढळल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, अखेर परळी रेल्वे स्थानक परिसरातून आरोपी आणि पीडित मुलगी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.