प्रयागधाम येथे मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस, दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल

उरुळी कांचन : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीसाठी काल (7 फेब्रुवारी) मतदान पार पडले. काल मतदान सुरू असताना कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम(ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदार केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम(ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर भेकराईनगर , फुरसुंगीतील बनावट ओळखपत्र तयार करुन हे मतदार मतदानासाठी आले असता सतर्क नागरिकांच्या साहाय्याने आणि भरारी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे.यात तीन संशयित मतदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या प्रकारमुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत निवडणूक यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
सुवर्णा मनोहर पांचाळ (वय 48, रा. काळेपडळ, हडपसर), वनिता मोहन ताठे (वय 38, रा. काळेपडळ, हडपसर) आणि लक्ष्मण प्रकाश बडगे (वय 21, मूळ रा. घाटी हिप्परगा, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक; सध्या रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नवनाथ बारीकराव कांचन (वय 41, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी वरील तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 172 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी सुजाता भूजबळ करीत आहेत.
मतदान करण्यास आलेल्या स्थानिक नागरिक व सजग मतदारांनी संशय व्यक्त केल्यानंतर ही बाब निवडणूक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे सादर केलेली ओळखपत्रे संशयास्पद असल्याचे उघड झाले. तत्काळ कारवाई करत निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन बोगस मतदारांना ताब्यात घेतले. मात्र, गोंधळाचा फायदा घेत इतर तीन जण घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पकडलेल्या बोगस मतदारांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे