पुण्यातील प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीला दर्शनासाठी बंद राहणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीचीं माहिती


पुणे : जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीच्या कालावधीत ( 12 ते 18 फेब्रुवारी 2026) दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्या अंतर्गतच मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षितेसाठी भव्य सभामंडप उभारणी, सुरक्षित प्रवेश गर्दी व्यवस्थापनासह विविध पायाभूत कामे वेगाने सुरू असल्याकारणाने यंदाच्या महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.

मंदिर परिसरातील कामाचे स्वरूप,भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची संख्या लक्षात घेता बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर बंद राहणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला भाविकांनी,स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभकाळात नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या प्रमाणावर भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. साधारणपणे दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येतील, असा अंदाज लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण करणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!