मोठी बातमी! सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री, परिपत्रक जारी..


पुणे : अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्याकडे आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ चौथ्या दिवशी झालेल्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती, मात्र आता सुनेत्रा पवार यांच्यावरच दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने राज्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आहे.

उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ अर्थ खाते वगळून अजित पवारांकडे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. त्यामुळे,आता पुणे आणि बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने चर्चा होत असातनाच त्याचीही माहिती समोर आली आहे.

पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आली असून शासनाने परिपत्रक जारी करत ही माहिती दिली. दरम्यान, सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीला मंत्रालयीन कार्यालयात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. मंत्रालयातून अजित पवार राज्यभरातील आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देत होते.

पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जातो. अशा महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने प्रशासन आणि विकासकामांबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांना पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आली आहे. अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील प्रशासनावर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं आणि तेथील जनतेशी मजबूत नातं तयार केलं होतं. त्यांच्या निधनानंतर बीडमध्येही शोक व्यक्त करण्यात आला होता. आता त्या जिल्ह्याचं पालकत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्याने, अजित पवार यांनी सुरू केलेली विकासकामं आणि प्रशासनिक सुधारणा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!