कष्टकऱ्यांचं ‘लाल वादळ ‘मुंबईत धडकणार ; सरकारसमोर नवा पेच, काय आहेत मागण्या?

मुंबई : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कष्टकऱ्यांच ‘लाल वादळ ‘मुंबईत धडकणार आहे.अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी आणि शेतकरी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ‘लाल वादळ’ मोर्चा सध्या संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नाशिकच्या वेशीवरून निघालेला हा मोर्चा 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहे. आंदोलनामागील मुद्दे केवळ आर्थिक स्वरूपाचे नसून ते आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. सोमवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या वेशिवर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मात्र यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आपल्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आता मुंबईत धडकणार आहे.
काय आहेत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या?

1.वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी : अनेक दशकांपासून वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींना अद्याप जमिनीचे मालकी हक्क मिळालेले नाहीत. वनाधिकार कायद्यांतर्गत हे हक्क मिळावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
2.स्वतंत्र सातबारा उतारा: वनजमीन आणि गायरान जमीन कसणाऱ्या धारकांना त्यांच्या जमिनीचा स्वतंत्र सातबारा उतारा देण्यात यावा.
3.पाणी वाटपाचा प्रश्न: पश्चिमेकडे वाहून जाणारे नद्यांचे पाणी अडवून ते स्थानिक आदिवासी आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.
4.शिक्षण आणि हमीभाव: शिक्षणाचे खाजगीकरण थांबवणे आणि शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी
सरकारकडून वर्षानुवर्षे आश्वासने दिली जातात मात्र कोणतीही प्रत्यक्षात ठोस अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आता हा पर्याय म्हणून मुंबईपर्यंत धडक देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.