राज्यातील हवामानात मोठा बदल, थंडीची लाट ओसरली अन् काही भागात पावसाच्या सरी, शेतकरी चिंतेत…


पुणे : हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात पाऊस कायम असेल. मात्र, जानेवारी महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय.

तसेच १ जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. जानेवारी महिना अखेरीस येताच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होताना दिसत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळी गारवा जाणवत असला तरी दुपारच्या सुमारास अनेक भागांत उष्णतेची जाणीव होत आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानात वाढ नोंदवली जात आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांत आज हवामान स्थिर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून पावसाची शक्यता नाही. मुंबईत किमान तापमान 18 अंश सेल्सियस, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सियसच्या आसपास राहील. ठाणे, कल्याण आणि पुणे परिसरात पहाटे धुक्याची शक्यता असून काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते.

दुपारच्या वेळी उकाडाही जाणवण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार असून येत्या काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. थंडीचा प्रभाव बहुतांश भागांत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांत काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या असल्या तरी पुढील आठवड्यात हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्येही दिवसभर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज हवामान संमिश्र स्वरूपाचं राहण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत हवामान स्वच्छ राहील, तर दुपारनंतर काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं.

पुण्यात कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 13 अंश सेल्सियसच्या आसपास राहील. सकाळच्या वेळी हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारनंतर सूर्यप्रकाशामुळे उष्णतेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!