क्रिकेटप्रेमींनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, जाणून घ्या वेळापत्रक…

नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 देशांच्या क्रिकेट संघात होणाऱ्या सामन्याची प्रतिक्षा असते. भारतात आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेदरम्यान टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे.

एक सामना आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार असून, दुसरा सामना आशिया कप रायजिंग स्टार्स वूमन्स टी20 स्पर्धेत इंडिया ए वि. पाकिस्तान ए संघांमध्ये रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा दिवस क्रिकेटचा महोत्सव ठरणार आहे.
दरम्यान, भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होत असून, या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून, दोन्ही संघातील कट्टर प्रतिस्पर्ध्यांमुळे हा सामना नेहमीच प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरतो.

याच दिवशी थायलंडमध्ये सुरू असलेल्या वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत इंडिया ए आणि पाकिस्तान ए महिला संघ आमनेसामने येणार आहेत. आशियाई क्रिकेट काउन्सिलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना 15 फेब्रुवारीला खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी असून, त्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
या स्पर्धेतील सामने दररोज दोन सत्रांत खेळवले जात आहेत. पहिला सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता, तर दुसरा सामना दुपारी 2 वाजता सुरू होतो. थायलंड वेळ भारतापेक्षा दीड तास पुढे असल्याने भारतात सामने अनुक्रमे सकाळी 8 वाजता आणि दुपारी 12:30 वाजता पाहता येतील.
