ठाणे कोणाच? शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरें बंधूंची तोफ धडाडणार ; सभेतून कोणावर निशाणा?

मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत.आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या चौकात ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेतून ते कोणावर निशाणा साधणार?भाषणात काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसची प्रथमच युती झाली असून या युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे. या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘ठाकरी तोफ’ धडाडणार असून या सभेची ठाकरे व मनसैनिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर दोन ते तीन माजी नगरसेवक वगळता शिवसेनेतील अन्य माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची धुरा राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव यांनी शिंदे सेनेला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार जितेंद्र आव्हाड यांचीही साथ लाभली.

आता या शिवसेनेतील फुटीचा केंद्रबिंदू ठाणे शहरात असल्याने पक्षीय फाटाफूट, शहरातील विविध समस्या या प्रश्नांवर दोन्ही नेते भाष्य करण्याची शक्यता आहे. पालिका अधिकाऱ्याला लाचखोरीत झालेली अटक, शहरातील वाहतूककोंडी, पायाभूत सोयीसुविधांवर येणारा ताण याबाबत ठाकरे बंधू सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठाकरे बंधूंची ही सभा मुंबईनंतर लक्षवेधी ठरणार असून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू भाषणातून निशाणा कोणावर साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.