शिरूर-हवेलीच्या पाणी नियोजनासाठी लवकरच महत्त्वपूर्ण बैठक; आमदार माऊली आबा कटके यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

वाघोली : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या अनुषंगाने पुणे पाठबंधारे विभाची कालवा सल्लागार समितीची बैठक लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भीमा नदीमधील पाणीसाठा आटल्यामुळे परिसरातील प्रादेशिक व स्थानिक पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. परिणामी, वाघोली पंचक्रोशीतील सुमारे एक लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीची दखल घेत आमदार कटके यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन भीमा नदीवरील सर्व बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. तसेच, भीमा नदीतील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन पाणी नियोजनासाठी पुणे पाठबंधारे विभागाची कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्या अनुषंगाने ही बैठक लवकरच पार पडणार आहे.
नदीकाठच्या सर्व गावांच्या गरजांचा विचार करून पाणी नियोजनाची मागणी


भीमा नदीवरील पाणीसाठ्याचे नियोजन करताना केवळ एका गावाचा विचार न करता नदीकाठच्या सर्व संबंधित गावांच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतीच्या खरीप हंगामातील पिकांना सिंचनासाठी आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता तसेच उपलब्ध जलसाठ्याचा समतोल वापर याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे होणाऱ्या बैठकीत या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना निश्चित होण्याकडे वाघोली पंचक्रोशीसह भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिरूर हवेली मतदार संघातल्या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक पाणी नियोजन करण्याकरिता माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. तसेच कुकडी सिंचन मंडळाची बैठक दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे होणार आहे.
या बैठकीत शिरूर तालुक्यासह आजूबाजूच्या गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय होईल. पिण्याचे पाणी, शेतीच्या सिंचनासाठी पाणी आणि पशुधनाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्यावर माझा भर आहे.”
-ज्ञानेश्वर कटके , आमदार , शिरुर-हवेली
