शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता जानेवारी की फेब्रुवारीत?

पुणे : राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ही दिला जातो.केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा 21 वा हप्ता सुमारे महिनाभरापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून, त्यानंतर लाखो शेतकरी सध्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र आचारसंहितामुळे हा हप्ता लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करताना शासनाला निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. याच कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नाही.
लाखो शेतकरी प्रतीक्षेत असलेल्या या योजनेचा हफ्ता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे.

दरम्यान पीएम किसान योजनेच्या मागील हप्त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या सुमारे 96 लाखांवरून 91 लाखांपर्यंत कमी झाली होती. त्याच धर्तीवर आता राज्याच्या योजनेतही 4 ते 5 लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे.
