राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे पक्ष सोडणार? एका शब्दात स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. मनसेचे मुंबईतील आक्रमक आणि चर्चेत असलेले नेते संदीप देशपांडे लवकरच मनसेला रामराम ठोकणार आहे असा दावा भाजपात नुकतेच प्रवेश केलेले संतोष धुरी यांनी केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले गेले. या चर्चावर प्रतिक्रिया देत देशपांडे यांनी पूर्णविराम दिला आहे.

मनसे पक्ष सोडण्याच्या चर्चांवर देशपांडे म्हणाले, कोणत्याही बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेवू नये. मी मनसेचं काम करत आहे. मनसेचंच काम मी नीट करत आहे आणि यापुढेही करत राहीन. माझी हात जोडून विनंती आहे की अशा अफवा पसरवू नका. महापालिका निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करत आहे.
या निवडणुका तोंडावर असताना संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा मनसेच्याच नेत्यांनी सुरू केली आहे. म्हणजे संदीप देशपांडेंनीही पक्षातून जावं, अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुरू आहे. यासाठी ते अशी चर्चा घडवून आणत आहेत, असा दावा मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या संतोष धुरी यांनी केला होता. मात्र मी मनसेतच राहून काम करणार आहे असा देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले, संतोष धुरी काय बोलत आहेत, यावर मला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. त्यांचा एक दृष्टीकोन असू शकतो. माझाही वेगळा दृष्टीकोन आहे. ते त्यांच्या दृष्टीकोनातून बोलतात आणि मी माझ्या दृष्टीकोनातून बोलतो. संतोष धुरी यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे, आता हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर, हे येणारा काळच ठरवेल असंही ते म्हटले.