मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदार ; निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब ; ‘सत्याच्या मोर्चा ‘चा इम्पॅक्ट

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आता मुंबई महापालिका निवडणुका पूर्वीच मतदारांचा मोठा घोळ समोर आला आहे.या महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळही मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोनदा-तीनदा नव्हे, तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदारयादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र मिळून निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं.पण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित घोळ तसाच ठेवला हे परत सिद्ध झालं आहे.मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे, तर 103 वेळा नाव असलेला मतदार आढळला आहे. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहे. त्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुबार मतदार असल्याचा केलेला दावा खरा असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अशा दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर पोहोचली आहे. मात्र, डुप्लीकेट मतदाराचे नाव किती वेळा वारंवार नोंदवले गेले आहे, याची माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन विशेष मोहिम हाती घेणार आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार मतदार हटवण्यासाठीची मोहिम चालवली जाणार आहे. 24 वॉर्डमधील निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे.
