काँग्रेसची मोठी कारवाई ; या ‘7’ नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी, कारण काय?

पुणे : नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठ्या दणक्यात विजय मिळवत काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव केला आहे. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत 7 नेत्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या विरोधात विधाने केल्यामुळे ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे.कांग्रेसचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी निवेदन जारी करत बिहार प्रदेश काँग्रेस शिस्तपालन समितीने सात नेत्यांवर कठोर कारवाई केली आहे. पक्षाच्या मुख्य तत्त्वांबद्दल, शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराबद्दलच्या हलगर्जीपणाबद्दल आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस सेवा दलाचे माजी उपाध्यक्ष आदित्य पासवान, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष शकीलुर रहमान, किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकुमार शर्मा, युवा काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष राजकुमार राजन, मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष कुंदन गुप्ता, बांका जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षा कांचना कुमारी आणि नालंदा जिल्हा नेते रवी गोल्डन यांचा समावेश आहे.
दरम्यान शिस्तपालन समितीने निलंबनाची कारवाई करताना असं म्हटलं की, या सर्व नेत्यांनी सातत्याने पक्ष व्यासपीठाबाहेर काँग्रेसच्या निर्णयांविरुद्ध भाष्य केले होते. तसेच प्रिंट आणि सोशल मीडियावर तिकीट खरेदी केल्याचे आरोप करत पक्षाच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान पोहोचवले होते, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे
