आजपासून भारतात ४ नवे लेबर कोड लागू, केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांची घोषणा, काय फायदा होणार? जाणून घ्या…

नवी दिल्ली : देशभरातील कामगारांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. केंद्र सरकारनं आजपासून चार नव्या लेबर कोड लागू केल्याची घोषणा केली असून यामुळं रोजगार, वेतन, सामाजिक सुरक्षा आणि कामगारांच्या हक्कांमध्ये मोठे बदल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी ही माहिती देताना हे फक्त बदल नसून कामगारांच्या सन्मान आणि हक्कांसाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगितलं. सरकारनं अस्तित्वात असलेल्या 29 जुन्या आणि गुंतागुंतीच्या कामगार कायद्यांना एकत्र करून चार सोप्या आणि स्पष्ट कायद्यांची रचना केली आहे.
दरम्यान, या चार संहितांमध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यवसायिक सुरक्षा व कामगार स्थिती संहिता 2020 यांचा समावेश आहे. हे कायदे आजपासून देशभर लागू झाले आहेत

केद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांच्या पोस्टनुसार सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे. युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल. महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल.
निश्चित कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी मिळेल. 40 वर्षांच्यावरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी मिळेल. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी, जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना 100 टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळेल, असं मनसूख मांडवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे..
या सुधारणा फक्त कामगारांसाठीच नव्हे तर उद्योग क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या आहेत. आधीचे कायदे तुटक, किचकट आणि कालबाह्य असल्यामुळे नोंदी, परवानग्या आणि कर्मचारी व्यवस्थापनातील अडचणी वाढत होत्या. नव्या संहितांमुळे प्रक्रिया डिजिटल झाली असून एकाच पद्धतीत नियम लागू राहणार आहेत.
केंद्र सरकारच्या मते, या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणि Developed India 2047 या लक्ष्याकडे एक मोठं पाऊल आहेत. आधुनिक, जागतिक श्रम कायदा मॉडेलप्रमाणे भारतातील कामगार प्रणाली अधिक पारदर्शक आणि न्याय्य होणार आहे.
भारतातील अनेक कामगार कायदे स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजेच 1930 ते 1950 च्या काळातील आहेत. अर्थव्यवस्था आणि जग बदललं आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था अपडेट झाल्या असून त्यांनी अलीकडच्या दशकात लेबर रेग्युलेशन्स केल्या आहेत.
भारतात तुटक, किचकट, कालबाह्य तरतुदी असणारे 29 केंद्रीय कायदे होते. नव्या चार लेबर कोडची अंमलबजावणी आधुनिक जागतिक ट्रेंडसशी जोडून घेणार आहेत. या नव्या कोडमुळं कामगार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असं सांगण्यात आलं आहे.