धक्कादायक! मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी अन बिअर कॅन; संयोजक कोण? ठाकरे सेनेचा सवाल…

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध आणि इतिहासाशी साक्ष देणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. या प्रकारानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मुंबई महापालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सोकॉल्ड ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीचं हे प्रकरण समोर आणलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट शेअर केली आहे. आता या प्रकारावर ठाकरेसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. याविषयात स्थानिक आमदार आशिष शेलारांवर टीका होत आहे. गडकिल्ल्यांवर दारु पार्टी होत आहे. सरकार आहे कुठे, सरकारची यंत्रणा काही आहे की नाही, सरकार झोपलेले आहे का, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी केला आहे. त्यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनाही सुनावलं आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांवर अशा पार्ट्या होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
अखिल चित्रे यांची संपूर्ण एक्स पोस्ट

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि
मुंबई महापालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सोकॉल्ड ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे… हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती !