सावधान! पुणे शहरात घुसलाय बिबट्या, 72 तासांपासून फिरतोय मोकाट, कुठे दिसला? जाणून घ्या….

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिरुरमध्ये दिवसाढवळ्या कुठेही बिबट्या दिसू लागले आहेत. नरभक्षक बिबट्यांमुळे शिरूर परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

दिवसा घराबाहेर पडायलाही लोक घाबरत आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना आता पुणे शहरात देखील बिबट्याने प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच मागील तीन दिवसात पुणे शहराच्या विविध भागात बिबट्याचा वावर आढळला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात लोकांना दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात घबराटीचं वातावरण आहे, अशात शहरातही आता बिबट्या शिरल्याने त्याला लवकरात लवकर जेरबंद करावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवडाभरापासून फुरसुंगी, मांजरी, शेवाळेवाडी आणि वडकी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. गेल्या आठवड्यात फुरसुंगी जवळील सोनारपूल परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे काही नागरिकांनी सांगितलं होतं.
त्यानंतर दोन-तीन दिवसातच मांजरी शेवाळवाडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ भावरावस्ती भागात परवा रात्री आणि दुपारी दीडच्या सुमारा रस्ता ओलांडत असताना बिबट्या दिसल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे.