तरुणांसाठी आनंदाची बातमी! पोलीस दलात निघाली मोठी भरती, जाणून घ्या अर्ज भरायची सर्व प्रक्रिया…

पुणे : राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यभरात तब्बल १५,३०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात ६५४ पदे भरली जाणार आहेत.

तसेच पोलिस दलात सामील होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. ठाणे पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahapolice.gov.in जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. अर्ज शुल्काची रक्कम पुढीलप्रमाणे आहे:

सर्वसाधारण प्रवर्गासाठी: ₹४५०
मागास प्रवर्गासाठी: ₹३५०
या भरतीसाठी उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असून उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी असावा.
भरती प्रक्रिया कशी असेल?
या भरती प्रक्रियेत एकूण २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.
१०० गुणांची शारीरिक चाचणी
१०० गुणांची लेखी परीक्षा
दरम्यान, शारीरिक चाचणीत धावणे, लांब उडी, गोळाफेक यासारख्या घटकांचा समावेश असेल. तसेच लेखी परीक्षेत सामान्यज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन आणि चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारले जातील. याशिवाय कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. दोन्ही परीक्षांतील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे.